१. प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी.
२. जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.
३. या जगात जो तो आपापल्याकरीता जगतो, हेच खरे, वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात. तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते; पण खरोखरचं ते आत्माप्रेम असते. एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला, तर वृक्षवेली सुकून जात नाहीत; त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे.. मग तो जवळ असो, नाही तर दूर असो, हे पाहू लागतात. तो शोधून ती टवटवीत राहतात.
४. दैव हे मोठं क्रूर मांजर आहे. माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा.
५. कुणाचही दु:ख असो ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो, अशी कल्पना करणं हा.
६. मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी, आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रियं हे घोडे, उपभोगांचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रीय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.
७. इंद्रियं हे या शरिर रथाचे घोडे होत. कारण त्यांच्यावाचून तो क्षणभरसुद्धा चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले, तर ते सैरावैरा उधळून रथ केव्हा कुठल्या खोल दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल याचा नेम नाही; म्हणून इंद्रिय रुपी घोड्यांना मनाच्या लागमच सतत बंधन हवं; पण हा लगाम देखील सतत सारथ्याच्या हातात असायला हवा! नाही तर तो असून नसून सारखाच! म्हणून मनावर बुद्धीच नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. अशा रीतीने रथ नीट चालेल; पण त्यात रथीच नसेल तर शेवटी रथ जाणार कुठे? त्याचं कार्य काय? सर्व मानवांत वास करणारा आणि आपल्यापैकी प्रत्येकात 'मी' च्यारुपाने असतो, तो आत्माच या शरीररुपी रथातला रथी होय.
८. या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे.
Author:– Vi. Sa. Khandekar
Book:- YAYATI
No comments:
Post a Comment